
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा जळगाव जामोद तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे पत्रकारांवरील हल्ले हे थेट लोकशाहीवरचे हल्ले आहेत. टोल नाक्यावर पत्रकारांना मारहाण करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे आणि त्यांना राज्यात कुठेही ठेका देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, नोव्हेंबर 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करून पत्रकारांवरील हल्ल्यांच्या प्रकरणांत सरकार कुचराई करत असल्याचा आरोपही संघाने केला. हा कायदा काटेकोरपणे लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन व्हावी, त्यात जिल्हा पोलिस अधीक्षक सचिव असावेत तसेच वकील संघाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदस्य म्हणून असावेत, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष विनोद चिपडे, तालुका उपाध्यक्ष संतोष कुलथे, तालुका सचिव अश्विन राजपूत, तालुका कार्यवाह अमोल भगत, तालुका संघटक मंगेश बहुरूपी, सहसंघटक विजय वानखडे, सहसचिव मनीष ताडे, सदस्य संदीप भावसार यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन देतांना तालुका अध्यक्ष विनोद चिपडे,पदाधिकारी व पत्रकार













