
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येथील इंगळे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव व रा. से. यो. अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी व परसरामपुर गावातील शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता बाबत मार्गदर्शनासोबत प्रात्यक्षिक करून दाखविले.
शेतकरी शेतामध्ये बियाणी पेरतो आणि 5 ते 7 दिवसानंतर ते उगवले की नाही ते तपासण्याकरिता शेतात जातो आणि काही कारणास्तव न उगवलेले बियाणे पाहून तो निराश होतो. त्यामुळे त्यांना पुन्हा पेरणी करावी लागते. त्यात त्यांचा वेळ तर जातोच पण त्यांचा अतिरिक्त पैसाही जातो. याच्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते.
हे सगळे टाळण्याकरिता बियाणे उगवण क्षमता तपासणी किती आवश्यक आहे. हे पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील कृषीकन्या स्नेहा इंगळे, ममता घुले, संगीता मिसाळ, प्रियंका दाभाडे, खुशी गौर, मेघा थारकर, प्रणाली इंगळे, विशाखा बोरसे, निकिता खांबलकर, अपूर्वा बोडखे यांनी शेतकऱ्यांना अगदी सोप्या व सहज पद्धतीने बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी याबाबत मार्गदर्शन करण्यासोबत प्रात्यक्षिक करून दाखविले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य गवई सर , कार्यक्रम अधिकारी व विषयतज्ञ प्रा. अविनाश आटोळे सर आणि कार्यक्रम समन्वय प्रा. प्रमोद डव्हळे सर यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला होता.













