
शिक्षक नसल्या कारणे आसलगावच्या शेकडो विद्यार्थ्यांचा पंचायत समितीला घेराव__
तात्काळ मिळाले चार शिक्षक.
जळगाव (जामोद): प्रतिनिधी अमोल भगत
तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये नववी आणि दहावीला केवळ एकच शिक्षक असून मुख्यध्यापकाचा पदभार सुद्धा त्यांच्याकडेच आहे. ह्या हायस्कूलमध्ये सहावी ते दहावीपर्यंत शेकडे विद्यार्थी शिक्षण घेत असून कित्येक दिवसापासून येथे शिक्षकांची कमतरता आहे. वारंवार निवेदन देऊनही शिक्षक न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी पालकांसह आसलगाव ते जळगाव जामोद सात किलोमीटर अंतर पायी चालत येऊन पंचायत समितीला घेराव घातला. शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनींनी “शिक्षण नाही, शिक्षक द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. गटशिक्षणाधिकारी वामनराव फंड यांनी विद्यार्थी व पालकांची भेट घेतली. संपूर्ण दोन तास ह्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. अखेर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलणी करून ह्या शाळेसाठी सध्या तात्काळ ४ शिक्षकांची नियुक्ती केली.
_________________________
अजून लवकरच दोन शिक्षक देऊ: गटशिक्षणाधिकारी फंड
पवित्र पोर्टल नुसार नवीन शिक्षक सध्या पंचायत समितीला जॉईन होऊ लागले आहेत. हे सर्व शिक्षक प्रायमरी विभागाचे असल्याने चार शिक्षकांची नियुक्ती ही तात्काळ करण्यात आली. यानंतर माध्यमिक विभागाकडे शिक्षक प्राप्त झाल्यानंतर अजून दोन शिक्षक देण्याचा प्रयत्न करू.तसे पण कालच दोन शिक्षकांची ऑर्डर काढली होती. ती ऑर्डर घेऊन आम्ही आसलगाव पर्यंत पोहोचलो होतो. शाळा समिती अध्यक्ष व सदस्यांना विद्यार्थ्यांना आसलगाव पर्यंत न येण्याची सांगितले, परंतु त्यांनी आमची विनंती धुडकावली व सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयामध्ये आले. ह्याचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, असे गटशिक्षणाधिकारी वामनराव फंड आणि केंद्रप्रमुख महादेव कुवारे यांनी बोलताना सांगितले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सात किलोमीटर विद्यार्थी विद्यार्थिनींनी पायी चालत येऊन पंचायत समितीला घेराव घालण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकार असेल. या सर्व विद्यार्थ्यांना फराळ पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.त्यानंतर विद्यार्थ्यांना सहकार विद्या मंदिर च्या शालेय बस ने आसलगाव पर्यंत पोहोचून देण्यात आले. आसलगाव येथील शाळा समिती आणि पालकांची भूमिका फार निर्णायक राहाली.













