
ओमप्रकाश राठी यांचा रोप्य महोत्सवी गौरव सोहळा संपन्न
जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत:-
ओमप्रकाश राठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा श्री गणेशा केला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे. त्यांनी दीर्घकाळ म्हणजे २७ वर्षे संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले. संस्थेसाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून येणाऱ्या काळात सभासदांचा आत्मविश्वास अधिक दृढ करण्यासह त्यांचे हित जोपासणे हे आपले आद्य कर्तव्य राहील, असे प्रतिपादन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिनबापू देशमुख यांनी केले.
श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा मावळते अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे अध्यक्ष तसेच संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केल्यानंतर सर्वानुमते सचिन देशमुख यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
दरम्यान ओमप्रकाश राठी यांच्या कार्याचा गौरव आणि नविन संचालकांना त्यांचे कार्य अवगत व्हावे या उद्देशाने संचालक मंडळाने त्यांचा रौप्य महोत्सवी कार्याचा गौरव सत्कार समारंभ आयोजित केला होता.
यावेळी कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष सचिन देशमुख हे बोलत होते. आपल्या मनोगतात सत्कारमूर्ती ओमप्रकाश राठी यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास सांगितला व संपूर्ण माहिती सर्व नवीन संचालक यांना विशद करून जबाबदारीची जाणीव करून दिली. यावेळी अध्यक्ष व सर्व संचालक आणि मान्यवरांनी ओमप्रकाश राठी यांचा सत्कार करून त्यांचा कार्याचा गौरव केला.
दरम्यान सचिन देशमुख यांनी सर्व संचालक यांचे आभार मानून ओमप्रकाश राठी यांनी कायम आमचे मार्गदर्शक म्हणुन रहावे अशी विनंती केली. प्रास्ताविकात संस्थेचे व्यवस्थापकज्ञानेश्वर उमाळे यांनी ओमप्रकाश राठी यांच्या २७ वर्षा च्या कार्याला उजाळा दिला तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक संजय दंडे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, आणि हितचिंतकांची उपस्थिती होती.