
सुनगाव ग्रामपंचायत चा निष्काळजीपणा
पंधरा दिवसापासून फुटलेली पाईप लाईन नादुरुस्त अवस्थेत
जळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून येथील मिसाळ लेआउट मध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पाईपलाईन फुटलेली असून येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. येथील नादुरुस्त पाईपलाईन चा खड्डा ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसापासून खोदून ठेवला असून अद्यापही मिसाळ लेआउट मधील पाणी प्रश्न मिटलेला पाईपलाईन नादुरुस्त असलेल्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला आहे व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून त्या ठिकाणी रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला. मिसाळ लेआउट मधून शाळकरी मुले जाणे येणे करीत असतात परंतु या खोदलेल्या खड्ड्यामुळे त्यांना येण्या जाण्यास अडथळा निर्माण होत आहे काही मुले तारेवरची कसरत करून खड्डा पार करण्याचा प्रयत्न करीत असून या खड्ड्यामध्ये शाळकरी मुले पाय घसरून पडू शकतात येथील नागरिकांनी कित्येक वेळा सरपंच ग्रामसेवक यांना पाईपलाईन दुरुस्त करून खड्डा बुजवण्याची विनंती केली तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने त्या खड्ड्याबद्दल कोणतेही पाऊल उचलले नाही. तसेच गावामध्ये ठिकठिकाणी कार्यरत असलेले पाईपलाईन वॉल तुटलेले व नादुरुस्त असून त्या ठिकाणी दुषित पाणी पाईपलाईन मध्ये जाऊन गावकऱ्यांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पोटाचे विकार यासह विविध दुर्धर आजार होत असून याबाबत ग्रामपंचायत प्रशासन सुस्त पडलेले आहे. ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठ्यावर चार ते पाच कर्मचारी असून वेळोवेळी फुटत असलेली पाईप लाईन वेळीच दुरुस्त का होत नाही असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे? याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना धारेवर धरून ही समस्या मार्गी लावण्यात यावी असे मागणी नागरिक करीत आहे.













