शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी संपली; सुप्रीम कोर्ट आता सोक्षमोक्ष लावणार; ऑगस्टमध्ये सर्वात मोठी सुनावणी होणार

0
70

 

नवीदिल्ली- शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.

आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणूक येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु, निवडणूक संपल्यानंतर म्हणजे 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत या प्रकरणाला दोन वर्षे झाली असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा, असे संकेत दिले. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का परत उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here