Home बुलढाणा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अवैध भाड्याचा दबाव टाकत पद्धतशीर लूट सुरू

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अवैध भाड्याचा दबाव टाकत पद्धतशीर लूट सुरू

0
25

श्रीकृष्ण तायडे मलकापूर तालुका प्रतिनिधी:-

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अवैध भाड्याचा दबाव टाकत पद्धतशीर लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, बेलाडच्या शेतकरी विनोद देविदास निंबोळकर यांच्या तक्रारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी थेट हस्तक्षेप करत प्रशासनाला जाब विचारल्याने बाजार समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

 

बेलाड येथील शेतकरी विनोद देविदास निंबोळकर हे मका विक्रीसाठी बाजार समितीत आले असता, अडते व व्यापाऱ्यांकडून त्यांच्यावर अवास्तव आणि अनधिकृत नियम लादण्यात आले. यामध्ये तब्बल ८०० ते १००० रुपये भाडे देण्याचा दबाव टाकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकाराला निंबोळकर यांनी ठाम विरोध दर्शवला. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच निलेश नारखेडे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत बाजार समिती सचिवांच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली.

 

 

 

“शेतकरी महिनोन्‌महिने काबाडकष्ट करून दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून शेती करतो, मात्र विक्रीसाठी बाजार समितीत आल्यावरच त्याची लूट होत असेल, तर ही बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापारी आणि अडत्यांसाठी?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

नारखेडे यांनी अडते व व्यापाऱ्यांवर ‘पांढऱ्या कपड्यातील काळे दलाल’ असा उल्लेख करत शेतकऱ्यांची पद्धतशीर लूट सुरू असल्याचा आरोप केला. तसेच सचिव म्हणून बाजार समितीतील व्यवहारांवर तुमचे नेमके नियंत्रण काय, असा जाबही त्यांनी विचारला. दरम्यान, बाजार समितीतील मूलभूत सुविधांचा अभावही या निमित्ताने समोर आला आहे. शेतकऱ्यांसाठी शौचालय, खानावळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच बसण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची बाब नारखेडे यांनी निदर्शनास आणून दिली.

 

 

 

विशेष म्हणजे, इतक्या तीव्र शब्दांत जाब विचारल्यानंतरही बाजार समिती सचिवांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासन शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय अधिक बळावला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे बाजार समितीतील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील काळात अधिक आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!