Home बुलढाणा सोनाळा ग्रामपंचायत प्रकरण तापले

सोनाळा ग्रामपंचायत प्रकरण तापले

0
43

 

 

सोनाळा ग्रामपंचायत प्रकरण तापले; चौकशी अहवाल न आल्यास आत्मदहनाचा इशारा….

बावनबीर प्रतिनिधी(अशोक आकोटकार)

प्रतिक्रिया:- सतिश वानखडे (सामाजिक कार्यकर्ता)

“सोनाळा ग्रामपंचायतीच्या दोन अधिकृत पत्रांमध्ये परस्परविरोधी माहिती समोर येत असतानाही चौकशीला होत असलेला विलंब संशय निर्माण करणारा आहे. प्रशासनाने २७ मेपर्यंत स्पष्ट अहवाल सादर करावा, अन्यथा ३ जूनपर्यंत होणाऱ्या कोणत्याही टोकाच्या आंदोलनास संबंधित विभाग व अधिकारी पूर्णपणे जबाबदार राहतील,”

 

तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या सोनाळा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत वारंवार तक्रारी समोर येत असून, वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीतील कथित नियमबाह्य पदभरती प्रकरणामुळे आता वातावरण अधिकच तापले असून, तक्रारदारांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सोनाळा ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या पत्रांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एका पत्रामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत कोणतीही भरती झालेली नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे, तर दुसऱ्या मासिक सभेच्या ठरावामध्ये कायमस्वरूपी कार्यालयीन पदभरती झाल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पत्रांवर अधिकृत स्वाक्षऱ्या व शिक्के असल्याने या विरोधाभासी कागदपत्रांवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पंचायत समिती स्तरावर सुरू असली तरी, गटविकास अधिकारी माधवराव पायघन व चौकशी अधिकारी प्रवीण सोनवणे हे चौकशी केवळ वेळकाढूपणाने पुढे ढकलत असल्याचा आरोप तक्रारदार प्रकाश म्हात्रे आणि सतीश वानखेडे यांनी केला आहे.

तक्रारदारांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार, २७ मेपर्यंत चौकशी अहवाल सादर न झाल्यास ३ जूनपर्यंत पंचायत समिती कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या घटनेची संपूर्ण जबाबदारी गटविकास अधिकारी माधवराव पायघन, चौकशी अधिकारी प्रवीण सोनवणे, ग्रामसेविका शुभांगी धोटकर आणि सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्यावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशी अहवालातून नेमके काय समोर येते, याकडे संपूर्ण संग्रामपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!