
सुपो पळशी येथील श्री सुपोजी महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात
जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी वसलेल्या व ब दर्जाप्राप्त श्रीक्षेत्र पळशी सुपो येथील श्री सुपो महाराज पौष रविवार यात्रेस १४ | जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.
यात्रेस मोठ्या संख्येने भाविकांचा महोत्सवास महिन्याच्या प्रत्येक रविवारला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी मराठी महिन्यातील पौष महिन्यात चार रविवार पडत असल्याने यात्रा | सुद्धा चार रविवारी भरणार आहे.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या शेगांव संस्थानानंतर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथे ३५० ते ४०० वर्षापूर्वीचे श्री सुपो महाराजांचे मंदिर आहे. येथे विदर्भ, मराठवाडा, खान्देश सह मध्यप्रदेशातून लाखो भाविक यात्रेनिमित्त दर्शनासाठी येतात.
यावर्षी १४ जानेवारी २०२४ रोजी पौष रविवारी या यात्रेस प्रारंभ झाला.असून श्री सुपो महाराज यात्रा
रविवारी साजरा होत आहे. यामध्ये रविवार १४ जानेवारी, २१ जानेवारी दुसरा रविवार, २८ जानेवारी तिसरा रविवार आणि २ फेब्रुवारी शेवटचा चौथा रविवारचा समावेश असून, रविवारी भव्य यात्रा भरत असते.
यात्रेत मोठ मोठी दुकाने, खेळणी, आकाशी पाळणे यांचेसह व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली असून मुक्ताईनगर, वरवट बकाल, बुऱ्हाणपूर, नांदुरा, जळगांव जामोद या चारही बाजूने थेट वाहने पळशी सुपोसाठी येतात. एस. टी. महामंडळाने ज्यादा बसेसची व्यवस्था केली आहे. जळगांव जामोद पोलिस स्टेशनकडून कडक
बंदोबस्त ठेवण्यात आला असून संस्थानकडून यात्रेकरूंना स्वच्छ पाणी स्नानगृहे, शौचालय तसेच राहण्याची झोपण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शनबारी व दर्शनासाठी उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. भंडाऱ्यासाठी मुबलक जागेची व्यवस्था असून शेकडो भंडारे यात्रे निमित्ताने होत असतात. येथील गवऱ्यामधील रोडग्याचा महाप्रसाद येथे प्रसिद्ध आहे. रात्री मुक्कामी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानकडून महाप्रसाद वितरण करण्यात येते. यात्रेनिमित्त संपूर्ण गावात पाहुण्यांची रेलचेल असून भक्तिमय वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळते.













