चार महिन्याच्या अन्वी ने लावली संगीत कार्यशाळेत हजेरी !
अ.भा.गां.म.वि.मंडळाची संगीत शिक्षक कार्यशाळा
मलकापूर प्रतिनिधी श्रीकृष्ण तायडे
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई द्वारा आयोजित संगीत शिक्षक, प्रशिक्षक व केंद्र व्यवस्थापक कार्यशाळा २३/२४ मे २०२६ रोजी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला चक्क चार महिन्याच्या अन्वी ने हजेरी लावली.
मलकापूर येथील संगीत विशारद तथा संगीत शिक्षिका सौ. वैष्णवी सुरज वानखडे यांनी या संगीत शिक्षक, केंद्र व्यवस्थापक व कथ्थक कार्यशाळेला एक महिन्यापूर्वी नाव नोंदणी करून प्रवेश घेतला. त्यानंतर त्या नियोजित तारखेला कार्यशाळेला हजर झाल्या. त्यांना कन्यारत्न आहे. त्यांचे ते कन्यारत्न चार महिन्याचे आहे. परंतु, कार्यशाळेची अशी सुसंधी पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून सौ. वैष्णवी सुरज वानखडे यांनी आपल्या चार महिन्याच्या अन्वीसह संगीत शिक्षक कार्यशाळेला हजेरी लावली.
चार महिन्याच्या अन्वीच्या काळजीसाठी त्यांचे पती दोन दिवस त्यांच्यासोबत होते. सौ. वैष्णवी सुरज वानखडे ह्या संगीत शिक्षक कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि बाळ सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी त्यांचे पती सुरज वानखडे यांनी स्वीकारली होती.
चार महिन्याच्या त्या बालिकेला श्री सुरज वानखडे हे सहकार विद्या मंदिराच्या परिसरातील झाडांच्या छायेत सांभाळ करत होते. सर्व संगीत शिक्षक त्या बाप – लेकीला कौतुकाने पाहत होते. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या कार्यशाळेला संगीत शिक्षक आणि शिक्षिका यांच्या मनामध्ये असले स्थान यावरून अधोरेखित होते.














