Home बुलढाणा जळगाव जामोद तालुक्याचे जिल्ह्यात वाढले राजकीय वजन

जळगाव जामोद तालुक्याचे जिल्ह्यात वाढले राजकीय वजन

0
38

जळगाव जामोद तालुक्याचे जिल्ह्यात वाढले राजकीय वजन

चार प्रमुख पक्षांची जिल्हास्तरीय सूत्रे एकाच तालुक्याकडे

प्रतिनिधी गोपाल बोपले

जळगाव जामोद : बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात जळगाव जामोद तालुक्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व उद्धवसेना या चारही प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष अथवा जिल्हाप्रमुख जळगाव जामोद तालुक्यातील असल्याने तालुका जिल्ह्याच्या राजकारणाचे नवे केंद्र बनला आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. घाटाखालील भागातून प्रथमच काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेतृत्व जळगाव जामोद तालुक्याकडे आल्याने या नियुक्तीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

भाजपने सचिन देशमुख यांच्यावर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक मजबूत करणे आणि संघटन विस्ताराला गती देणे या दृष्टीने त्यांची पुनर्नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून बाजार समितीचे सभापती प्रसेनजित पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाच्या ग्रामीण संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. जिल्हास्तरीय राजकारणात त्यामुळे जळगाव जामोद तालुक्याचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गजानन वाघ यांची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली होती. जिल्ह्यात पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे संघटन आणि आगामी निवडणुकांची रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क व संघटन कौशल्याच्या बळावर त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. चारही प्रमुख पक्षांचे जिल्हास्तरीय नेतृत्व जळगाव जामोद तालुक्याकडे आल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुक्याचे राजकीय वजन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उमेदवारी निश्चिती, तिकीट वाटप, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीती या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तालुक्याची भूमिका प्रभावी राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकूणच, जिल्हा राजकारणात जळगाव जामोद तालुक्याने प्रभावी राजकीय केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली असून, चार प्रमुख पक्षांच्या नेतृत्वामुळे तालुक्याच्या राजकीय प्रतिष्ठेत मोठी भर पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!