Home बुलढाणा सरपंच संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा.

सरपंच संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा.

0
90

वान प्रकल्प पाणीपुरवठ्यावर सरपंच संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा.

 

 

शेगाव( निलेश कवळे ) तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप करीत सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी प्रशासनास कठोर शब्दांत निवेदन सादर केले आहे. वान प्रकल्प पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या प्रश्नासंदर्भात यापूर्वी तीन वेळा संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली होती. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलन स्थगित करण्यात आले होते. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे.

सध्या परिसरात मिळणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना सुमारे दहा किलोमीटर अंतरावरून पाणी विकत आणावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबे, शेतमजूर आणि गरीब नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असताना प्रशासनाची उदासीनता ही चिंताजनक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

शासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून वान प्रकल्प पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर सुरू करावी. तोपर्यंत पर्यायी उपाय म्हणून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भाऊ डिवरे, अमोल भाऊ अंधारे, राजेंद्र बघे, शिवा भाऊ विटे, ज्ञानेश्वर पाटील, पिटू भाऊ धोरन, शुभम वावरे, प्रमेश्वर भाऊ घोरपडे, संतोष भाऊ पवार, मंगेश वानखडे तसेच सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष रामा पाटील थारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाने यापुढेही केवळ आश्वासनांवर वेळ घालवला, तर उद्भवणाऱ्या जनआक्रोश, आंदोलन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही सरपंच संघटनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!