जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-
शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या मुजोर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे ला सेवेतुन बडतर्फ करा….! मागणी
घडलेल्या प्रकाराचा जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी केला निषेध…!
वाशीम जिल्ह्यातील मौजे गोगरी (ता. मंगळुरपीर) येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा अंतर्गत लागवड केलेल्या फळबागेची मजुरी मागील चार महिन्यांपासून रखडली असल्याने अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तक्रारी नंतर कृषी अधिकारी सचिन कांबळे पाहणीसाठी आले असताना या तक्रारीचा राग मनात धरून व्हिडिओ का काढतो म्हणत थेट शेतकऱ्याला बुटाने मारहाण करून शिवीगाळ केली. तरी या मुजोर कृषी अधिकऱ्याला बडतर्फ करून याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा.यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व या घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यात आला.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी, अनिलसिंह राजपूत, वैभव जाणे, शिवदास खिरोडकार, तालुकाध्यक्ष अमोल बहादरे, पवन वायझोडे, सागर गवई, सय्यद शेख, त्रिलोकसिंग राजपूत तसेच इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.














