Home बुलढाणा संघर्ष वाहन चालक-मालक युनियनतर्फे पत्रकार व पोलिसांचा भव्य सत्कार संपन्न

संघर्ष वाहन चालक-मालक युनियनतर्फे पत्रकार व पोलिसांचा भव्य सत्कार संपन्न

0
156

 

जळगाव जामोद प्रतिनिधी अमोल भगत :-

पत्रकार दिन व पोलीस स्थापना सप्ताहानिमित्त संघर्ष वाहन चालक-मालक युनियन संघ, जळगाव जामोद यांच्या वतीने दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी डायमंड ट्रान्सपोर्ट समोर बुलढाणा जिल्ह्यातून प्रथमच भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकार बांधव तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास काँग्रेस नेते बाबू जमादार व अनिल जैस्वाल यांनी विशेष उपस्थिती लावत कार्यक्रमास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. समाजातील सलोखा, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पत्रकार व पोलीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष सय्यद जुनेद व महासचिव अमजद खान यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास येथील पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच खामगाव, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर, जामोद, सुनगाव व जळगाव जामोद येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, वाहन चालक हे देशाच्या दळणवळण व्यवस्थेचे खरे शिलेदार असून सैनिकांप्रमाणेच ते आपली सेवा बजावत असतात. प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींमध्ये पोलीस प्रशासन व पत्रकारांचे सहकार्य मोलाचे ठरते. हे सहकार्य भविष्यातही कायम राहावे, या भावनेतून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद हुसेन होते. प्रमुख उपस्थितीत संघटनेचे पदाधिकारी, फाउंडेशन मेंबर, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सय्यद जुनेद यांनी मानले.या कार्यक्रमामुळे वाहन चालक-मालक संघटना, पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!