जळगाव जामोद बस स्टँड परिसरात चोरीच्या घटनेत वाढ.. दोन महिलांचे सोन्याचे दागिने केले लंपास…
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
जळगाव जामोद :सध्या मोठ्या प्रमाणात लग्नसराईची धुम सुरू असून बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा भुरटे चोर घेताना दिसत असून असाच एक प्रकार जळगाव जामोद बस स्थानक परिसरात दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. जळगाव जामोद ते सोनाळा ही गाडी आपल्या प्लॅटफॉर्मवर लागली होती त्यावेळी गाडीमध्ये चढण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती याच संधीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने बस मध्ये चढणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील लाडनापुर येथील उषा गिरी व बस स्थानकावर उभे असलेल्या उषा सुधाकर गावंडे राहणार शेतखेडा शेवगा तालुका संग्रामपूर या दोन महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. सोनाळा जाणाऱ्या बस मध्ये चढल्यावर बॅग उघडी दिसल्याने बॅक चेक केली असता बॅग मधील पॉकेटच गायब केल्याचे दिसले. या पाकिटात सोन्याचे मंगळसूत्र पोत, कानातले व नाकातील नथ ठेवल्या होत्या. तसेच दुसऱ्या महिलेच्या बॅगची चैन उघडून त्याचे सुद्धा कानातल्या सोन्याच्या बाळ्या चोरून नेल्याचे समजते याची तक्रार या दोन्ही महिलांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. यामध्ये एकुण ६० हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत त्याच्याविरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता गाडी ज्या जागेवर उभी होती त्या ठिकाणी कुठलाच कॅमेरा नसल्याचे समजते. त्यामुळे आगार प्रमुखांनी समोरच्या साईटला कॅमेरा लावावा अशी मागणी बस स्थानक परिसरातील नागरिक करीत होते. तसेच बस स्थानकावर पोलीस चौकी असून ही चौकी नेहमीच बंद असते त्यामुळे बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना मागील काही दिवसापासून घडत आहे याकडे पोलीस प्रशासनाने ही लक्ष देण्याची गरज आहे. तसेच काही दिवसापूर्वी आगार प्रमुखांनी पोलीस स्टेशनला बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात चिडीमारी होत असल्याबाबत, तसेच अवैध पार्किंग, यासह काही टवाळखोर मुले बस स्थानकावर येऊन मुलींची छेड काढतात याबाबतचे पत्र दिले होते परंतु अद्यापही पोलीस प्रशासनाने बस स्थानकावर एकही पोलीस कर्मचारी दिला नाही. बस स्थानक परिसरातून आजपर्यंत ३२ मुली पळून गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. यामुळे जळगाव जामोद बस स्थानकावरील पोलीस चौकी यासह हिरकणी कक्ष तातडीने सुरू करून या होणाऱ्या घटनांवर आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून होणाऱ्या घटनांवर आळा घालावा.














