Home बुलढाणा रोकडिया नगरात मृत्यूचा सापळा, रस्त्याच्या मधोमध दीड फूट उंच चेंबर;

रोकडिया नगरात मृत्यूचा सापळा, रस्त्याच्या मधोमध दीड फूट उंच चेंबर;

0
24

शेगावातील रोकडिया नगरात मृत्यूचा सापळा, रस्त्याच्या मधोमध दीड फूट उंच चेंबर; दोन वर्षांपासून अधिकारी-लोकप्रतिनिधींचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

प्रतिनिधी गोपाल बोपले

शेगाव  येथील रोकडिया नगरात जाणारा जुना चिंचोली रस्ता सध्या ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याच्या अगदी मधोमध दीड फूट उंच चेंबर उभारून ठेवले आहे. हा चेंबर नसून उघडउघड अपघाताला दिलेले निमंत्रणच आहे.

या भागात भूमिगत गटार योजनेचे काम कासवगतीने सुरू आहे. काम करताना रस्त्याच्या मधोमधच सुमारे दीड फूट उंचीचा चेंबर बांधून ठेकेदाराने आणि यंत्रणेने हात वर केले. दोन वर्षांपासून हा अडथळा तसाच उभा आहे. दुचाकी, चारचाकी चालकांना चुकवता चुकवता रोज तारेवरची कसरत करावी लागते.

संतापजनक बाब म्हणजे या परिसरात रात्री पथदिवेही नाहीत. अंधारात हा दीड फुटाचा ‘मृत्यूचा खड्डा’ दिसतच नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत या ठिकाणी तब्बल सहा अपघात झाले आहेत. अनेकांना किरकोळ-गंभीर दुखापती झाल्या आहेत. तरीही नगर परिषद अधिकारी, मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींना हा दोष दिसत कसा नाही, असा सवाल रोकडियावासी विचारत आहेत.

स्थानिक नागरिक सांगतात, एरव्ही एखादा कार्यकर्ता विरोधात गेला की ताडकन जागे होणारे लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे गेल्या दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागायला येणारे, आता साधी पाहणीदेखील करायला तयार नाहीत.

या चेंबरमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रुग्णवाहिकाही येथून जाताना हादरते. दोन वर्षे होऊनही काम पूर्ण नाही आणि केलेल्या अर्धवट कामामुळे जनतेचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार या यंत्रणेला कुणी दिला, असा उद्विग्न सवाल नागरिक करत आहेत.

या ‘उंच चेंबर’ प्रकरणी तातडीने कारवाई करून तो जमिनीसमान करावा, रस्ता दुरुस्त करावा आणि रात्रीच्या वेळी पथदिव्यांची सोय करावी, अशी मागणी रोकडिया नगरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!