दुर्धर आजाराने ग्रस्त लाभार्थ्याचे घरी जाऊन दिली सेवा…
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
सुनगाव, वाघजाळ शिवारातील सुकलाल जमरा हे आदिवासी शेतकरी दुर्धर आजाराने ग्रस्त असुन अंथरूणाला खिळलेल्या अवस्थेत सध्या आहे. ते कोणत्याही कार्यालयात जाऊ शकत नसल्याने त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यांचे बैंक खाते आधार सिडेड नसल्याने पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणे बंद झाले होते. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सदर बाब निदर्शनास आली आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन खाते उघडण्याचे ठरले. त्यानुसार सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम वाघजाळ शिवारातील शेतकऱ्याच्या घरी पोस्टमास्तर श्री. केदार यांना आवश्यक त्या साहीत्यासह घेऊन जाऊन नविन पोस्टल बैंक खाते उघडण्यात आले. आता श्री. सुकलाल जमरा यांना PM किसान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) सह सर्वच शासकीय योजनांचे DBT व्दारे अनुदान मिळेल. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी संजय सावंत, कृषी सहाय्यक तृप्ती धाकुलकर, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत हे उपस्थित होते. एका गरजवंताला मदत केल्याचे समाधान लाभल्याचे मनोगत अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्त केले.














