मलकापूर आगाराची बस खड्डयात उतरली
मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा-खेडी रोडवरील घटना; १० ते १२ प्रवासी जखमी
प्रतिनिधी शुभम ढवळे
धा. बढेः
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी दिले जाते. मात्र, भंगार बसेस व खराब रोड अपघाताला कारणीभूत ठरत आहे. अशीच एक घटना मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा ते खेडी रोडवर आज गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. रोडचे काम सुरु असल्याने मलकापूर आगाराची बस रस्त्याच्या कडेच्या चरीत उतरल्याने १० ते १२ प्रवाशी जखमी झाले. सुदैवाने जिवीतहानी टळली.मलकापूर आगाराचे चालक सुरडकर हे मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा येथे सकाळी आपली बस क्र.एम.एच. ४० एन. ९४८६ घेवून गेले होते.
सदर बस गोतमारा येथून मलकापूरकडे परत घेवून येत होते. मात्र, सध्या या मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे एका बाजुचे काम सुरु असल्याने दुसऱ्या बाजुने वाहतूक वळविण्यात आली होती. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीचा भरावा व अरुंद रस्ता असल्याने समोरुन येणाऱ्या वाहनाला साईड देतांना चालक सुरडकर यांना अंदाज न आल्याने त्यांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजुच्या खोल चरीत उतरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मात्र, बसमधील १० ते १२ प्रवाशी किरकोळ जमखी झाले. बसमध्ये ४० प्रवाशी प्रवास करीत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींवर जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. मलकापूर- कुन्हा गोतमारा रस्त्याचे काम रेंगाळलेले असल्याने आणि सुरक्षा नियमांचे पालन न होता मातीचा उपसा व भराव केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.














