सुनगांव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ… एकाच जागेचा दोनवेळा केला कर वसूल…
जळगाव जामोद:- प्रतिनिधी
सूनगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.सुनगांव येथील रहिवासी असलेले प्रकाश विठ्ठल ताडे यांच्याकडुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांने एकाच जागेचा दोन वेळा घर कर वसूल केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी समोर आली आहे.घरमालक प्रकाश विठ्ठल ताडे यांनी यासंबंधी ची तक्रार गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांना दिली असून पुढील कारवाई गटविकास अधिकारी करणार असा विश्वास घरमालक प्रकाश विठ्ठल ताडे यांना आहे.सविस्तर असे की ते राहत असलेल्या जागेचा घरकर १७२५ रुपये त्यांनी १४ मे २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन रितसर पावती घेऊन भरणा केला होता.व त्यांना काही कामानिमित्त घराचा गाव नमुना आठ काढायचा असल्याने त्यांनी २७ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाव नमुना आठ ची मागणी केली असता तेथील कर्मचारी संतोष ताडे यांनी तुमच्याकडील थकीत असलेली घरपट्टी रुपये १८२५ रुपये भरणा करून गाव नमुना आठ घेऊन जा असे म्हटल्याने पुन्हा एकदा तक्रारदार प्रकाश विठ्ठल ताडे यांनी १८२५ रुपयाची घरपट्टी भरून रितसर पावती घेतली व गाव नमुना आठ घेतला.. त्यामुळे येथील ग्रामपंचायतचा सावळा गोंधळ व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पणा निदर्शनास आला आहे.प्रकाश विठ्ठल ताडे यांनी जर १४ मे रोजी घरपट्टी भरलेली असुन सुद्धा त्याची नोंद त्या कर्मचाऱ्याला रजिस्टर मध्ये घ्यायची होती परंतु तसे झाले नाही. घरमालक रितसर घरपट्टी भरून पावती घेत असेल तर त्याची नोंद करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बंधनकारक असून सुद्धा येथील कर्मचारी त्याची नोंद करत नाही यामुळे येथील नागरिकांची आर्थिक लूट ग्रामपंचायत कर्मचारी करीत असल्याचे समोर येत आहे. एकाच वर्षात एकाच जागेचा दोनवेळा घरकर येथील कर्मचारी वसूल करताना दिसत आहेत. येथील ग्रामपंचायत प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले असून सदर कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशा मागणीची तक्रार २७ सप्टेंबर रोजी घरमालक प्रकाश विठ्ठल ताडे यांनी गटविकास अधिकारी यांना केली आहे. सुनगाव ग्रामपंचायत मध्ये नागरिकांच्या घरकराच्या पैशाचा अपहार तर होत नाही ना अशी चर्चा गावातील नागरिकांमध्ये होत आहे. व ग्रामसेवक हितेंद्र जोशी यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही का याची कसून चौकशी करण्याची मागणी प्रकाश विठ्ठल ताडे व येथील नागरिक करीत आहेत.














