जळगाव जा. प्रतिनिधी अमोल भगत
अतिवृष्टी रक्कमेच्या अपहार
प्रकरणी तलाठ्यासह तीन आरोपींना गुन्हे शाखेने २५ डिसेंबर रोजी अटक केली आहे.याबाबत असे की, तालुक्यात गेल्यावर्षी ता.२२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अहवालात तत्कालीन तहसीलदार यांच्या आशीर्वादाने दोन तलाठी व संगणक चालक यांनी काही बनावट शेतकऱ्यांच्या नावांची यादी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे सादर करून बनावट शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार केला होता. याप्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते. यानंतर आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गुन्हे शाखेने यातील आरोपी तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माटे आणि महादेव पाटील
तहसीलचे संगणक चालक अशा तीन आरोपींना आज ता. २५ डिसेंबर रोजी अटक केली असून त्यांची रवानगी बुलडाणा येथे कारागृहात करण्यात आली आहे.
ह्या आर्थिक गैरव्यवहारात तत्कालीन तहसीलदार शितल सोलाट हा सुद्धा सहभागी असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच त्यांनी जळगाव खान्देश जिल्ह्यातील मडगाव येथे बदली करून घेतली.
स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय पद्धतीने ही कार्यवाही केली. याविषयी स्थानिक पोलिस स्टेशन, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना विचारणा केली असता यांना सुद्धा या कार्यवाहीची माहिती नव्हती. मुख्य सूत्रधार या प्रकरणाचे दुसरेच असून या तिघांना अटक झाल्यामुळे तत्कालीन तहसीलदार शितल सोलाट आणि मुख्य सूत्रधाराचे धाबे दणाणले आहे.
■ या प्रकरणात बोराळा, आसलगाव, धानोरा, वाडी खुर्द येथील बरेच दलाल अडकतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यांनी सुद्धा कोट्यावधीच्या अपहारात आपले हात धुवून घेतले आहेत.
त्यांच्यावर कार्यवाही होण्याची दाट शक्यता आहे.














